Review Blog : लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय!

by - 7:05 AM


'बीपी' (बालक पालक)..................

लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय!

आपल्या भारतीय समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जातं. मग इतका संवेदनशील विषय कोणी, कसा आणी कधी शिकवायचा?? साधारण वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून हे असंही काही असतं याची जाणिव व्हायला सुरूवात होते आणि ते नेमकं काय असतं हे जाणून घ्यायच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहचतात. बरं कुतूहुल म्हणून वाटलेल्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मोठ्या माणसांकडे विचारायचीही सोय नसते. अशा वेळी पालकांची मानसिकता आड येते. मग सभोवती असणार्‍या परिस्थितीतून जसं जसं या विषयातलं ज्ञान पिवळी पुस्तकं, सी ग्रेडच्या फिल्म, ब्लु फिल्मच्या सिडी-डिव्हीडीज अशा चुकीच्या पध्दतीने मुलांना मिळत जातं तसं तसं लैंगिक शिक्षण ह्या विषयाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळंच आणि चुकीचं चित्र निर्माण होऊ लागतं. ज्या वेळी अशा सगळ्या गोष्टी मुलांच्या जीवनात प्रवेश करतात त्या वेळेला त्यांचं बालपण संपलेलं असतं आणि पौगंडावस्थेला सुरूवात झालेली असते.

रवि जाधवचा बालक पालक हा सिनेमा ह्या विषयाचं गांभीर्य आणि त्याबद्दलचा उपदेश अगदी हलक्या फुलक्या आणी सहज-सोप्या पध्दतीने लोकांपर्यंत पोहचवतो. मुलांच्या आणि पालकांच्या मधला दुवा साधण्याचं काम हा चित्रपट योग्य रितीने करतो. चित्रपटातलं कथानक हे ८०-९० च्या दशकात घडत असताना दाखवलंय. कथानक कधीही घडत असलं तरी प्रश्न मात्र तेच राहतात. अव्या, भाग्या, डॉली, चिऊ मध्यमवर्गीय घरातली १३ ते १४ वयोगटातली मुलं.

त्यांच्या आनंदाश्रम चाळीत असणार्‍या ज्योती ताईने गैरवर्तन केल्यानंतर चाळीत तिच्याबद्दल उलट-सुलट चर्चा होऊ लागतात आणि अशा एका चर्चेतून त्यांच्या कानावर पडतं "तरी मी आधी सांगत होते. आता काय? खाल्लं ना शेण!?" यातल्या खाल्लं ना शेण ह्या शब्दांचा अर्थ त्यांच्या बालमनाला झेपत नाही आणि मग दिवाळीतल्या सुट्टीत ह्या शब्दांचा अर्थ शोधण्याचं ते ठरवतात. बराच प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना त्या शब्दांचा अर्थ मिळत नाही तेव्हा ते भाव्याचा मित्र 'विशू'ची मदत घ्यायचं ठरवतात. विशू हा त्यांच्याच वयाचा झोपडपट्टीत वावरणारा मुलगा. पण भौतिक परिस्थितून त्याला हे सगळं खुप लवकरच कळायला लागलेलं असतं. मग तो त्याच्या पध्दतीने जमेलं तसं हे ज्ञान त्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो.

ढिचँक-ढिचॅक! विशू त्याच्या पध्दतीने ह्या मुलांना समजेल असं ह्या विषयाला नाव देतो आणि अगदी सोप्या भाषेत त्यांना समजवायचा प्रयत्न करतो. मग पहिल्यांदा पिवळ्या पुस्तकांच चुकीचं माध्यम निवडून विशू त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा तो प्रयत्न करतो. ढिचाँक-ढिचाक हे प्रत्येकाच्या मनात लपलेलं असतं जो त्याला बाहेर न काढता फक्त मनातच दडवून ठेवतो तो सभ्य आणि जो ते बाहेर काढतो तो असभ्य. विशूचं लैंगिक शिक्षणाबद्दलचं अतिशय अचुक पण मार्मिक मत. पिवळ्या पुस्तकांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे भाड्याने व्हिसीआर आणून तसले 'स्पेशल' सिनेमे पाहण्यापर्यंत जातो. ह्या सगळ्यातून त्यां मुलांमध्ये वैचारीक आणि मानसिक बदल होत जातात. आणि मग वयाने मोठ्या असणार्‍या चाळीतल्या मुलीला आय लव्ह यु बोलण्यापासून ते नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी करण्यापर्यंत त्या मुलांची मजल जाते. ब्लु फिल्म पाहिल्यानंतर भाग्याला चाळीतल्याच पण त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या नेहा ताईंबद्दल आकर्षण निर्माण होतं तर अव्याला चिऊबद्दल प्रेमाची भावना जागृत होऊ लागते.

चाळीतल्या कदम काकांना या गोष्टी माहीत पडल्यानंतर ते या मुलांच्या पालकांना जागं करण्याचा प्रयत्न करतात पण आधीच सभ्यतेची झापडं आपल्या डोळ्यांवर लावलेल्या त्या पालकांना ह्या गोष्टीतलं गांभीर्य पटकन कळत नाही. मुलांमध्ये हे ज्ञान देण्यासाठी पालकांकडूनच विरोध होतोय हे पाहिल्यानंतर कदम काका स्वतः मुलांना लैंगिक शिक्षणाविषयी समजावून सांगतात.

चित्रपटातल्या मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती विशू ह्या मुलाच्या माध्यमातून होते. पण आता सद्यस्थितीत विशूच्या जागी अनेक पोर्नोग्राफिक संस्थळ, मॅग्झीन्स, रस्त्यावर सहजरीत्या उपलब्ध होणार्‍या ब्लु फिल्मच्या सिडीज हे काम करताना दिसतात. पाश्चात्य देशात लैंगिक शिक्षण हे महत्वाचं मानलं जात असून ते आता शालेय उपक्रमातही सामाविष्ट केलं गेलंय पण त्याचबरोबर भारतासारख्या विकसनशील देशात हा विषय जाहिररीत्या बोलण्यात अजूनही लोकांना दडपण येतं.

असो.

'सेक्स एज्युकेशन' सारख्या धाडसी विषयाला हात घातल्याबद्दल रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर या दोन्ही निर्मात्यांचं कौतूक करावंस वाटतं.

नटरगं आणि बालगंधर्वनंतर रवी जाधव माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत आला होता त्यामुळे त्याच्यासाठी हा सिनेमा पाहायला जाणं खुप आधीपासूनच ठरवलं. इतका नाजुक विषय पण त्याने त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून बरोबर हाताळलाय कि ज्यामुळे चित्रपट कुठेही भडक वाटत नाही.

चित्रपटाची कथा अंबर हडप आणि गणेश पंडीत यांनी प्रभावीपणे लिहलीय. मुलांच प्रबोधन करण्यासाठी कदम काका हे कॅरेक्टर नेमकं निवडलंय. विशाल शेखर यांनी दिलेलं चित्रपटाचं संगीत कानांना ऐकायला बरं वाटतं. विशाल दादलानीने गायलेलं करूया आता कल्ला कल्ला कल्ला हे एकदम गाणं एकदम रॉक झालंय. त्यातल्या त्यात शेखरचा आवाज असलेलं 'हरवली पाखरे' हे गाणं मला खुपच आवडलं. चुकीच्या लैंगिक शिक्षणामुळे मुलांच्या भावविश्वात झालेले बदल आणी त्यांच हरवत चाललेलं बालपण हे गाणं नेमक्या शब्दात व्यक्त करतं. चाळीतले कदम काका मुलांना 'सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो' शिकवत असतात आणि नेमक्या त्याच वेळेला हि चारही मुलं विशूच्या साह्हायाने ब्लु फिल्म पाहण्यासाठी भाड्याने व्हिसीआर घेऊन येतात. आणि बॅकग्राऊंडला गाणं वाजत असतं...

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.

सिच्युऐशनला अनुसरून असणारं गाणं..एकदम चपखल! गुरू ठाकूर आणि रवि जाधव यांनी लिहलेल्या गीतांचे शब्द लक्षात राहतील असे आहेत.

महेश लिमयेच्या सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाला ऐक वेगळा आणि फ्रेश लुक येतो. दिवाळीतली दृश्य, नदीवरची सगळी दृश्य अतिशय सुंदर आहेत. चित्रपटात दाखवलेली आनंदाश्रम नावाची चाळ बहुदा आमच्या ठाण्यातल्या बी-केबीन इथली असावी.

चित्रपटात अविनाश खर्शीकर, आनंद अभ्यंकर, माधवी जुवेकर, सुप्रिया पाठारे, सई ताम्हणकर, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, सतिश तारे या सगळ्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे अभिनय केलाय. किशोर कदम यांनी सगळ्यांची काळजी घेणारा आणि मुलांवर बारीक लक्ष ठेवणारा कदम काका उत्तम साकारलाय. थोड्या काळासाठी अमृता सुभाष आणि सुबोध भावे हे दोघंही चमकून जातात. पण या चित्रपटाची सर्वात महत्वाची आणि मुख्य बाजु म्हणजे यातल्या सर्व बाल कलाकारांनी केलेला अभिनय. प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, भाग्यश्री सकपाळ, रोहित फाळके या पाचही मुलांनी अप्रतिम अभिनय केलाय. विशेषतः प्रथमेश परबने साकारलेला विशू. ह्या मुलाने विशूच्या भुमिकेत धम्माल अभिनय केलाय.

छान सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट पालकांनी आपल्या मुलांसोबत बसून आवर्जून पाहायला हवा. मला व्यक्तिशः खुप आवडला. चित्रपटाच्या सुरूवातीलाच फ्रँकलीन रोझवेल्टचं एक समर्पक वाक्य आहे.

'we may not be able to prepare the future for our children, but we can at least prepare our children for the future.'

****

You May Also Like

0 comments