चुकीच्या प्रश्नाचे गुण वाढवून मिळावेत

by - 11:07 PM

मा. संचालक , दि.०५/१२/ २०१२
पुणे विद्यापीठ उपकेंद्र,
अहमदनगर.
विषय- एम ए च्या प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या प्रश्नाचे गुण वाढवून मिळणे बाबत.....
महोदय,

पुणे विद्यापीठातर्फे गेल्या नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम सत्र परीक्षेत एम ए. मराठीच्या भाषाविज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न टाकूविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. एकूण ८० मार्कांचा हा पेपर होता त्यामध्ये १६ मार्कांचा हा अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना गोंधळात टाकले आहे.
विद्यापीठाच्या या प्रश्नपत्रिकेतील चुकीमुळे विद्यार्थ्यांना ५ टक्क्यांचा फटका बसणार आहे. गुरुवारी दिनांक २२ नोव्हेंबर ला झालेल्या 'भाषाविज्ञान- वर्णनात्मक व सामाजिक' या विषयाच्या पेपर मध्ये 'पदाची घटना म्हणजे काय? ते सांगून, स्वरूप स्पष्ट करा' असा एकूण १६ गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात विचारण्यात आला होता. मात्र, अभ्यासक्रमामध्ये कुठेही हा भाग नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडविता आलेला नाही. या प्रश्नाला पर्यायी अर्थसंकल्पाचा प्रश्न होता. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची तयारी केली नव्हती त्यांचे मात्र या प्रश्नामुळे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
पद म्हणजे गीत असाही अर्थ होतो. त्यामुळे ही गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी पद, पदीम, पदांतर ऐवजी भाषाविज्ञान मध्ये रूप,रुपिम,व रुपिकांतर तसेच स्वन, स्वनिम, स्वनांतर ही व्यापक संकल्पना भाषावैज्ञानिकांनी वापरात आणलेली आहे. पुणे विद्यापीठानेही २००० सालच्या अभ्यासक्रमात हा बदल अमलात आणलेला आहे. त्यामुळे पदाच्या घटनेबाबतचा प्रश्न चुकीचाच असून या प्रश्नाचे सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना संपूर्ण गुण देण्यात यावे. अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत.
तरी आमच्या या मागणीचा गंभीरपणे विचार करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा निकालानंतर जर गुण न मिळाल्याचे लक्षात आल्यास छात्रभारती च्या नेतृत्वाखाली एम ए चे संपूर्ण विद्यार्थी व संघटनेचे कार्यकर्ते मिळून उपकेंद्राचे कामकाज बंद पाडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील व नंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी संपूर्णतः विद्यापीठावर राहील याची आपण दखल घ्यावी.
आपला,
केदार भोपे



You May Also Like

0 comments