पुस्तकी गराड्यातील विद्यार्थी ....

10:19 PM


पुस्तकी गराड्यातील विद्यार्थी  ....


केदार भोपे .

मो. ८०५५३७३७१८

स्वतंत्र भारताचे भवितव्य असणारा भारताचा भावी नागरिक म्हणजे आजचा विद्यार्थी... आजच्या विद्यार्थ्याचे भवितव्य योग्य त-हेने घडवले गेले तरच उद्याचा समाज आणि भारताचे भविष्य उज्वल ठरणार आहे. आपल्या देशावर असलेले त्याचे प्रेम, निष्ठा, आई-वडील-थोरामोठ्यांचा आदर करणारी जीवनमुल्ये त्याचेजवळ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.


परंतू सद्य:स्थितीचा विचार करताना आपण खरंच असे विद्यार्थी घडवत आहोत का ? आजची शिक्षण पद्धती असे विद्यार्थी तयार करण्यात सक्षम आहे का ? किंवा आजची शिक्षण पद्धती असे विद्यार्थी निर्माण करण्यात कितपत यशस्वी ठरत आहे यावर देखील विचार करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात, त्यांच्यावर योग्य संस्कार करण्यात, त्यांच्या मनात जीवनमुल्यांचे नंदनवन फुलविण्यात आजाची शाळा, महाविद्यालये किती यशस्वी झाली आहेत यावर विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यापेक्षा फक्त सुशक्षित बेकारांचे लोंढे आपण निर्माण करत आहोत. पुर्वी ज्ञानार्जन करण्यासाठी आई-वडील आपल्या मुलाला गुरूकुलात पाठवत असत. तिथे गुरूच्या आज्ञेत राहून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधला जात असे. मात्र आजची विद्यार्थांची अवस्था लक्षात घेण्यासारखी आहे.आज विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की, "बाळ, तु अभ्यास कशासाठी करतोस ?" त्याचे उत्तर असते, "परीक्षेसाठी...."
एखाद्या नामवंत शाळेत प्रवेश घेण्यासाठी परीक्षा, नोकरीसाठी मिळविण्याठी परीक्षा, लहान मुलांच्या चेह-यावरील निरागस हास्य या परीक्षेच्या गराड्यात हरवून गेले आहे. आज लहान लहान मुलांनाही पुर्व प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी परीक्षेला सामोरे जावे लागते. घरात आई-वडील, आजी-आजोबा यांना लहान सहान प्रश्न विचारणारी, प्रत्येक गोष्ट जिज्ञासूवृत्तीने पाहणारी लहान मुलं खरी ज्ञानार्थी असतात, आपण मात्र त्यांना परीक्षार्थी बनवत असतो. आज शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेतील गुणांसाठी धडपडताना दिसतात. पालकांच्या अपेक्षेचे ओझे मनावर घेऊन परीक्षेला सामोरे जातात आणि परीक्षेतील नैराश्यामुळे आत्महत्यादेखील करतात. परीक्षेचा ध्यास घेताना मुळ ज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र विसरून जातात. सुट्टीच्या काळात देखील या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासवर्गांचे आयोजन केले जाते. त्याला प्रवेश घेण्यासाठी देखील परीक्षा....


अशा परिस्थितीत त्या मुलांनी त्यांना आवडणारे विषय, पुस्तके केव्हा वाचायची...? त्याला आवडणारे खेळ केव्हा खेळायचे....? निसर्गाचा आस्वाद कधी घ्यायचा...? फक्त पदवी हातात मिळविण्यासाठी शिक्षण घ्यायचे. खरंच या क्रमिक पुस्तकांच्या अभ्यासक्रमातून जीवनातील व्यवहारांचे ज्ञान प्राप्त होते...?


आज विद्यार्थांचा पुस्तकी शिक्षणामुळे प्रत्यक्ष जीवनातील व्यवहारांशी ज्ञानाचा संबंध राहिलेला दिसत नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतरही बाहेरच्या जगात त्याचा निभाव लागेल याची शाश्वती नाही. परीक्षा देताना सुद्धा कॉपी, प्रश्नपत्रिका फोडणे, पैसे देऊन पदवी मिळविणे अशा मार्गांचा वापर होताना दिसतो. नोकरी मिळविण्यासाठी पैसे द्यावे लागतात. विद्या, ज्ञान हे मानवाच्या प्रगतीचे मूळ आहे. पण आजच्या व्यवस्थेत फक्त परीक्षा महत्त्वाची मानली जाते. शैक्षणिक संस्थांच्या बाजारामुळे शिक्षणाच्या दर्जावरही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. हे सर्व बदलण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षण होणे गरजेचे आहे. एखाद्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शिक्षणाची गरज भासली की, आपोआपच विद्यार्थी ज्ञानार्थी बनेल. त्याची ज्ञानलालसा वाढविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या अपेक्षांचे ओझे त्याच्या पाठीवर टाकण्यापेक्षा त्याची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला त्याप्रकारचे शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.


आपला पाल्य फक्त पदवी मिळविण्यासाठी शिकवायचा नाही, तर जीवनातील व्यवहारांचे चढ-उतार, संघर्षाला सामोरे जाण्यासाठी घडवायचा आहे याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याला जेव्हा याची जाणीव होईल तेव्हा तो नुसता परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी होईल यात शंका नाही. जगातील अन्य देशातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपण जे विद्यार्थी घडवत आहोत ते विद्यार्थी फक्त पुस्तकी गराड्यात न राहता त्यांच्यावर व्यावसायिक दृष्ट्या संस्कार घडवणे महत्त्वाचें आहे.त्यांना अशा पुस्तकी गराड्यातून बाहेर पडून विविध प्रकारचे खेळही जमले पाहिजेत. आज जागतिक पातळीवर तीव्र स्पर्धा चालू आहे या स्पर्धेत विद्यार्थ्यांना उतरवायला पाहिजे. सर्वच विद्यार्थी जर पुस्तकी किडा बनून राहिले तर क्रीडा विश्वाचा नाश होण्याची भीती आहे. याकरिता भारत सरकारने विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले पाहिजे. आपण आपल्या विद्यार्थी पाल्याला अभ्यास एके अभ्यास करूत त्याच्यावर मानसिक दडपण तर आणत नाही ना हेही पाहणे तितकेच महत्वाचे आहे.

You Might Also Like

2 comments

  1. वर्षभर घोका आणि परीक्षेत ओका सांगणारी आपली शिक्षण पध्धत
    मुलांना गुणार्थी बनविते.
    पु ल देशपांड्यांच्या शब्दात गप्पा बसा हि संस्कृती ज्यात प्रश्न , शंका विचारणे पाप समजले जाते. ह्या विषयावर अंत्यंत मुद्देसूद लेख लिहिला आहे त्याबद्दल विशेष आभार.

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर ....

    ReplyDelete

Like us on Facebook